नाशिकची शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम आणि गरुड रथोत्सव !


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Kalaram Mandir Nashik Rathotsav | श्रीराम आणि गरुड रथयात्रा श्रीराम नवमी निमित्त काढण्यात येते . या रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून आजही हा रथोत्सव अविरतपणे सुरू आहे.

पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून नाशिकला एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. श्रीरामनवमी निमित्त काढण्यात येणारी श्रीराम आणि गरुड रथयात्रा ही नाशिकची शेकडो वर्ष जुनी रथयात्रा आहे. ही रथयात्रा दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशीला काढण्यात येते . यावर्षी हा रथोत्सव शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून काढण्यात येणार आहे.

रथोत्सवाची परंपरा कशी सुरू झाली ?

सवाई श्रीमंत माधवराव पेशवे आजारी असताना त्यांनी लवकर बरे व्हावे म्हणून श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी श्री काळाराम मंदिर नाशिक येथे नवस केला होता. माधवराव पेशवे यांना बरे वाटल्यानंतर श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी श्री काळरामाला रामरथ अर्पण केला होता. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे या रामरथाच्या देखभालीची जबाबदारी दिली होती. सरदार रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करून अनेक पहिलवान घडवले होते. त्यांच्या तालमीतील हे पहिलवान रथोत्सवात रथ ओढत असे. तेव्हापासून ते आज पर्यंत श्रीरामरथ आणि गरुड रथ ओढण्याची जबाबदारी सरदार रस्ते आखाडा तालीम संघाकडेच आहे.

रथोत्सवाचे मानकरी कोण आहेत ?

एकदा रथोत्सवात ओढत असताना रथ वाघाडी नाल्यातल्या चिखलात अडकला त्यावेळी पाथरवट समाजातील काही कार्यकर्त्यांनी परत बाहेर काढला. तेव्हापासून श्रीराम रथाचा पाथरवट समाजाला देण्यात आला. राम रथाचे मानकरी हे सरदार रास्ते खडा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत. तसेच गरुड रथाचा मान अहिल्याराम व्यायाम शाळेला देण्यात आला.

रथोत्सवाचे स्वरूप

गरुड रथ आणि श्रीराम रथाचे मानकरी काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांना सर्वप्रथम फेटे बांधून त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर श्रीराम प्रभूची यथासांग पूजा, आरती आणि मंदिराला प्रदक्षिणा झाल्यावर पालखीतून प्रभू श्रीरामांच्या पादुका आणि उत्सवमूर्ती काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या बाहेर आणली जाते. रथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने चालतात. गरुड रथात प्रभू श्रीरामांच्या पादुका तसेच श्रीराम रथामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवलेली असते. या रथोत्सवात सर्वप्रथम मिरवणुकीतील मानकरी त्यानंतर पालखी, ढोल-झांजपथक आणि त्यानंतर गरुड रथ आणि मग श्रीराम रथ असा क्रम असतो.

रथोत्सवाचे मार्गक्रमण

काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून “जय सीता राम सीता” च्या गजरात रथोत्सवाला सुरुवात होते. उतार असलेल्या ठिकाणी रथांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी उटीची व्यवस्था केलेली जाते. श्रीराम रथाची मिरवणूक म्हसोबा पटांगणावर आल्यावर तेथे श्रीरामचा रथ थांबतो. प्रभू श्रीराम व्रतस्थ असल्यामुळे ते गोदावरी नदी ओलांडत नाही अशी अशी प्रथा असून गरुड रथ शहराच्या विविध भागातून मिरवला जातो.

कापड पेठेतील बालाजी मंदिराच्या येथे गरुड रथाचे आरती होते. हे आरती करण्याचे कारण बालाजीवाले यांचे पूर्वज सत्पुरुष मानले जाणारे श्री तीमैय्या महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची मंदिरा स्थापना झाली आहे. तीमैय्या महाराज यांचा मान म्हणून या बालाजी मंदिरात आरती केली जाते. त्यानंतर गाडगे महाराज पुलाखाली म्हसोबा पठाण पटांगणावर गरुड रथ येतो आणि या गरुड रथाचा दांडा श्रीराम रथाला लावला जातो म्हणजेच पूजा श्रीराम रथाला अर्पण होते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही अविरत सुरू आहे. पुढे हा रथोत्सव रामकुंडाकडे मार्गस्थ होतो. राम कुंडावर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला स्नान घातले जाते नंतर ही मिरवणूक पहाटेपर्यंत काळाराम मंदिरात येते आणि रथोत्सवाचा समारोप होतो.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More : नाशिक चा “नवश्या गणपती” त्याचा पेशवेकालीन इतिहास तुम्हाला माहित आहे का?

Leave a Comment