वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी नाशिक वनविभागाने केली ४६ हातपंप असलेल्या पाणवठ्यांची निर्मिती!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Nashik City Forest News | वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जसा मानवी जीवनावर परिणाम होत आहे तसा वन्यजीवांवर सुद्धा परिणाम होत आहे . वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाण्याचे साठे देखील कमी होत आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यामुळे वन्यप्राण्यांचा पाणी पिण्यासाठी लोकवस्ती कडे येण्याचा धोका असतो. हे कारण लक्षात घेऊन आणि वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती कमी व्हावी यासाठी नाशिक वनविभागाकडून ४६ पाणवठ्यांचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू होते. हे ४६ पाणवठे नाशिक वनविभागातील आठ वनपरिक्षेत्रामध्ये असून या पाणवठ्यांवर हातपंपाची ही उभारणी करण्यात आली आहे.

या पाणवठ्यांचा उपयोग वन्यजीवन बरोबरच आजूबाजूच्या आदिवासी पाडे आणि गावांनाही याचा उपयोग होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील बऱ्याच तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांची जैव विविधता बघायला मिळते. उन्हाळ्यात ग्रामीण भागात नागरिकांना जसा पाणीटंचाईचा सामना करावा लागतो तसाच वन्यजीवांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे मागील वर्षी नाशिक वनविभागाने नाशिक, पेठ, सिन्नर, हरसुल, त्रंबकेश्वर, ननाशी, इगतपुरी यासारख्या वनपरिक्षेत्रांमध्ये कॅम्पा योजनेअंतर्गत नवे पाणवठे जंगलाच्याजवळ उभारण्यात आले आहे. या पाणवठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या पाणवठ्यांभोवती बोरवेल्स करून त्यावर हातपंप बसवण्यात आले आहे. जेणेकरून ह्या पाणवठ्यांमध्ये वनरक्षक, वनमजुरांना सहजरित्या पाणी भरता येईल. तसेच आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांना व गावांना या हातपंपाद्वारे पाणी घेता येईल.

नाशिक वनविभागातील पूर्वभागात येवला वनपरिक्षेत्रात असलेले ममदापूर हे काळवीट संवर्धन राखीव वनक्षेत्र काळवीट, निळगाय, लांडगा, कोल्हा, खोकड, तरस या वनप्राण्यांसाठी ओळखले जाते. तसेच चांदवड वनपरिक्षेत्रातील वडाळीभोईजवळील गोहरण गावाच्या शिवारात सुमारे शंभर ते दिडशे हेक्टर गवतीमाळ वनक्षेत्र देखील काळवीटांच्या आदिवासाकरता प्रसिद्ध आहे. कॅम्पा योजनेअंतर्गत या दोन्हीही वनपरिक्षेत्रात पोषक अशा विविधप्रजातीच्या गवताची लागवड केली असल्याने काळवीटांसारख्या तृणभक्षी वन्यप्राण्यांची भूक भागत आहे. तसेच या भागातही पाणवठे उभारण्यात आले आहेत.


गोहरण क्षेत्रात जागोजागी सिमेंटच्या मोठमोठ्या कुंड्या ठेवून त्यामध्ये वन विभागाद्वारे पाणी भरले जाते. तसेच या क्षेत्रात एक मोठा नैसर्गिक पाणवठा असून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी आणून टाकले जाते. तसेच ममदापूर संरक्षण क्षेत्रात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सुमारे १५ बोरवेल्स असून त्याद्वारे १८ पाणवठे भरले जातात. या वनक्षेत्रात नैसर्गिक १५ जलस्रोत देखील आहेत.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!